
नागपूर : नववर्षाच्या पूर्वसंध्येला घरगुती वादाचे रूपांतर भीषण घटनेत झाले असून, यशोधरा नगर परिसरात पतीने पत्नीला बेदम मारहाण करून ठार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी यशोधरा नगर पोलिसांनी आरोपी पतीला काही तासांत अटक केली आहे.
रामेश्वरी देवेंद्र मनेश्वर (वय ३३) असे मृत महिलेचे नाव असून ती मूळची मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील रहिवासी होती. सध्या ती पती देवेंद्र मनेश्वर (वय ३८) याच्यासह नागपूरच्या किंखेडे लेआऊटमध्ये वास्तव्यास होती. पोलिस तपासानुसार आरोपीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. तसेच तो वारंवार पैशांची मागणी करत दारूच्या नशेत तिच्यावर मारहाण करत असल्याची माहिती समोर आली आहे.
३१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास पैशांच्या कारणावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की आरोपीने पत्नीला जबर मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत तिला तत्काळ मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले
मृत महिलेचा भाऊ रामकिशोर मधु पाचे यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरा नगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.








