नागपूर : कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रेल्वे क्रॉसिंगजवळ मंगळवारी, २३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी भीषण अपघात घडला. भरधाव ट्रकच्या धडकेत सायकलवरून जाणाऱ्या ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
सपना महेश मार्कंडे (रा. मिनी माता नगर, पाचझोपडा परिसर, जैन धर्मार्थ रुग्णालयाजवळ, कळमना) असे मृत महिलेचे नाव आहे. सायंकाळी साडेचार ते सव्वाचारच्या दरम्यान डेप्युटी सिग्नल रोडवरील रेल्वे क्रॉसिंगजवळ ही घटना घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, सपना सायकलवरून जात असताना एमएच ४० सीटी ९५९६ क्रमांकाचा ट्रक भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवण्यात येत होता. ट्रकने सायकलला जोरदार धडक दिल्याने सपना रस्त्यावर कोसळली. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर तिला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
मृत महिलेचे पती महेश सुकितराम मार्कंडे (वय ३४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम २८१ आणि १०६(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.









