
नागपूर: विदर्भ साहित्य संघाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय व इतर वाङ्मय पुरस्कारांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. येत्या १४ जानेवारी २०२६ रोजी विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. सर्व पुरस्कारांचे स्वरूप ५,००० रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे आहे.
पु. य. देशपांडे स्मृती पुरस्कार धोंडुजी इंगोले यांना ‘शिक्षणाचा गुताडा’ आणि सुरेंद्र दरेकर यांना ‘समर ऑफ सेव्हेंटी नाईन’ या कादंबऱ्यांसाठी जाहीर झाला आहे. डॉ. सुभाष बाभुळकर यांना ‘डॉ. आनंदकुमार स्वामी’ या ग्रंथासाठी डॉ. वा. वि. मिराशी स्मृती वैचारिक वाङ्मय पुरस्कार देण्यात येणार आहे. कुसुमानिल स्मृती समीक्षा पुरस्कार ‘आस्वाद’ या पुस्तकासाठी डॉ. रविकिरण पंडित यांना जाहीर झाला असून, य. खु. देशपांडे स्मृती शास्त्रीय लेखन पुरस्कार ‘आदिकाल : एक इतिहास (पूर्वार्ध व उत्तरार्ध)’ या ग्रंथासाठी डॉ. अनिरुद्ध वझलवार यांना दिला जाईल.
शरदचंद्र मुक्तीबोध स्मृती काव्य लेखन पुरस्कार प्रमोदकुमार अणेराव यांच्या ‘भंडाऱ्याच्या डोंगरावरून लाईव्ह’ या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. वा. ना. देशपांडे स्मृती ललित लेखन पुरस्कार *‘कपाळ गोंदण’*साठी निशा डांगे आणि *‘घानमाकड’*साठी अविनाश महालक्ष्मे यांना देण्यात येणार आहे.
नवोदित साहित्य लेखन पुरस्कार डॉ. साधना काळबांडे (‘कोचम’), आर. आर. पठाण (‘गावाकडच्या कथा’), सुनील बावणे–निल (‘स्याडा कोटसा भरते’) आणि डॉ. देवेंद्र तातोडे (‘वणवा पेटत आहे’) यांना जाहीर झाले आहेत. शांताराम कथा पुरस्कार ‘पद्मगंधा’ दिवाळी अंकातील ‘आनंद शोधूनि पाहे’ या कथेसाठी मानसी होळेहुन्नूर यांना दिला जाईल.
हरिकिसन अग्रवाल स्मृती पत्रकारिता पुरस्कार ‘नवराष्ट्र’ वृत्तपत्राच्या पत्रकार जयश्री दाणी यांना जाहीर झाला आहे. कविवर्य ग्रेस स्मृती पुरस्कार ‘युगवाणी’ नियतकालिकातील सर्वोत्कृष्ट लेखासाठी प्रेषित सिद्धभट्टी यांच्या कवितेला देण्यात येणार आहे. विदर्भ साहित्य संघ विशेष उल्लेखनीय पुरस्कार धनराज खानोरकर यांच्या ‘संजोरी’ आणि मेजर (नि.) मोहिनी गर्गे–कुलकर्णी यांच्या ‘अपराजिता’ या ग्रंथांना जाहीर झाला असून, उत्कृष्ट शाखा पुरस्कार वाशिम शाखेला देण्यात येईल.
अण्णासाहेब खापर्डे स्मृती आत्मचरित्र पुरस्कार विष्णू सोळंके (‘संवाद मौनाशी’) आणि नीता चापले (‘क्षितिजगामी: एक प्रवास अपराजित जिद्दीचा’) यांना दिला जाईल. वा. कृ. चोरघडे स्मृती कथा पुरस्कार डॉ. अनंता सूर (‘कोंडमारा’) आणि डॉ. अजितसिंह चाहल (‘सहस्त्र पाकळ्यांची रात्र’) यांच्या कथासंग्रहांना जाहीर झाला आहे.
नाना जोग स्मृती नाट्यलेखन पुरस्कार प्रभाकर दुपारे यांच्या ‘समग्र नाटक’ या ग्रंथाला, तर बा. रा. मोडक स्मृती बालसाहित्य पुरस्कार डॉ. केतकी काळेले (भोकरे) यांच्या ‘छुपा राक्षस’ आणि मालविका देखणे यांच्या ‘मायरा आणि देवराईचे गुपित’ या पुस्तकांना देण्यात येईल.
यंदापासून सुरू करण्यात आलेला अरण्यऋषी मारुती चितमपल्ली स्मृती पर्यावरण संशोधन ग्रंथ पुरस्कार माणिक पुरी (‘तळे, पक्षी आणि माळरान’) आणि अनंत सोनवणे (‘एक होती माया’) यांना जाहीर झाला आहे. शतकोत्तर तृतीय वर्ष विशेष पुरस्कार शैला मुकुंद (‘पंडित जितेंद्र अभिषेकी: कला आणि जीवनप्रवास’) आणि शोभा बेंद्रे (‘माणिक मोती’) यांना दिला जाईल.
राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये विदर्भ साहित्य संघ अनुवाद पुरस्कार निलेश रघुवंशी यांच्या ‘एक कसबे के नोट्स’ या ग्रंथाच्या राजा होळकुंदे यांनी केलेल्या ‘एका निमशहराच्या नोंदी’ या अनुवादाला जाहीर झाला आहे. कविवर्य श्रीधर शनवारे स्मृती कविता पुरस्कार दिनकर मनवर यांच्या ‘झेन्नाच्या कविता’ या काव्यसंग्रहाला, तर डॉ. आशा सावदेकर स्मृती समीक्षा पुरस्कार डॉ. विनोद राऊत यांना ‘नामदेव ढसाळ यांची कविता: आस्वाद आणि चिकित्सा’ या ग्रंथासाठी देण्यात येईल.








