
नागपूर : अखेर रविवारी नागपूर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत असून, राजकीय चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील १५ नगरपरिषदा व १२ नगरपंचायतींमध्ये कोणाचा वरचष्मा राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काटोल नगरपालिकेच्या सर्व १२ प्रभागांचे निकाल जाहीर झाले असून, नगराध्यक्षपदावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) व शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार अर्चना देशमुख यांनी २३७६ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. काटोलमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार)–शेकाप आघाडीला एकूण १२ जागा, तर भाजपला १३ जागा मिळाल्या आहेत. मात्र नगराध्यक्षपद राष्ट्रवादी–शेकाप आघाडीने पटकावत मोठा राजकीय धक्का भाजपला दिला आहे.
दरम्यान, न्यायालयीन अपिलामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या कामठी, नरखेड, रामटेक नगरपरिषद तसेच कोंढाळी नगरपंचायत क्षेत्रातील ९ प्रभागांसाठी शनिवारी शांततेत मतदान पार पडले. या मतदानानंतर जिल्ह्यातील एकूण मतदान टक्केवारीत वाढ नोंदवण्यात आली आहे.
जिल्ह्यातील २७ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी २ डिसेंबर रोजी ६१.२५ टक्के मतदान झाले होते. एकूण ७ लाख २९ हजार ८२२ मतदारांपैकी ४ लाख ४७ हजार ११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये २ लाख २८ हजार १८६ पुरुष, २ लाख १८ हजार ८२३ महिला तसेच २ इतर मतदारांचा समावेश आहे.
या निवडणुकांमध्ये नगराध्यक्षपदांच्या २७ जागांसाठी तब्बल १६७ उमेदवार रिंगणात होते. उर्वरित नगरपरिषद व नगरपंचायतींचे निकाल जाहीर होत असताना जिल्ह्यातील राजकीय समीकरणे कोणत्या दिशेने वळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








