
नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीदरम्यान बजाजनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत बेकायदेशीर दारूसाठा आणि सुमारे १८ लाखांची महिंद्रा थार चारचाकी वाहन जप्त केले आहे.
या कारवाईत एकूण १९ लाख १६ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई शुक्रवारी (१९ डिसेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास बजाजनगर चौक ते अभ्यंकरनगर चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर, पीव्हीके वाईन शॉपजवळ करण्यात आली. या प्रकरणाची नोंद बजाजनगर पोलीस ठाण्यात शनिवारी पहाटे २.१७ वाजता करण्यात आली.
या गुन्ह्यातील फिर्यादी पोलीस हवालदार नितेश मेश्राम (बजाजनगर पोलीस ठाणे) असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ते पथकासह गस्त घालत असताना संशयास्पद अवस्थेत उभी असलेली काळ्या रंगाची महिंद्रा थार दिसून आली. वाहन थांबवून पंचासमक्ष झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात बिअर आणि विदेशी दारूचा साठा आढळून आला.
पोलिसांनी जप्त केलेल्या दारूसाठ्याची किंमत १ लाख १६ हजार २९० रुपये असून, वापरात असलेली महिंद्रा थार वाहनाची किंमत सुमारे १८ लाख रुपये आहे. त्यामुळे एकूण जप्त मुद्देमालाची किंमत १९ लाखांहून अधिक आहे.
या प्रकरणात सुनील शामराव उईके (वय ५४, रा. पंधराबोडी ट्रस्ट लेआउट रोड, शिवमंदिर परिसर, नागपूर) आणि योगेशकुमार दत्तूजी मेश्राम (वय ३४, रा. लोणी, ता. देओली, जि. वर्धा) अशी आरोपींची नावे आहेत. परवानगीशिवाय अवैध विक्रीसाठी दारू वाहतूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
महाराष्ट्र दारूबंदी कायदा तसेच बीएनएस भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, जप्ती पंचनामा व इलेक्ट्रॉनिक पुरावे संकलित करण्याची प्रक्रिया घटनास्थळीच पूर्ण करण्यात आली.
ही कारवाई झोन-१चे पोलीस उपायुक्त तसेच सोनेगाव विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बजाजनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व पथक या कारवाईत सहभागी होते.
महानगरपालिका निवडणुकीदरम्यान बेकायदेशीर दारूवाटप व प्रलोभन रोखण्यासाठी शहरभर कडक तपासणी सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.








