
नागपूर : शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या मोठ्या फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश करत नागपूर पोलिसांनी हिंगणा एमआयडीसीतील एका छापखान्यावर छापा टाकला. या कारवाईत ‘बालभारती’च्या तब्बल २० हजारांहून अधिक बनावट पाठ्यपुस्तके जप्त करण्यात आली आहेत. बालभारतीचे उत्पादन अधिकारी राकेश पोटदुखे यांनी दिलेल्या गोपनीय माहिती आणि तक्रारीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित टोळी बेकायदेशीररीत्या सरकारी पाठ्यपुस्तकांची छपाई करून ती बाजारात वितरित करण्याच्या तयारीत होती. विद्यार्थ्यांची फसवणूक करत आर्थिक लाभ मिळवण्याचा हा प्रकार असून, यामुळे शैक्षणिक व्यवस्थेलाच धोका निर्माण झाला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी छापखान्यातील साहित्य ताब्यात घेतले असून, संपूर्ण रॅकेटचा माग काढण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. बनावट पुस्तकांच्या छपाईमागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेण्यासाठी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.








