
नागपूर – महापरिनिर्वाण दिनानिमित्त दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. संविधानामुळेच देशातील लोकशाही टिकून आहे, आणि बहुजन समाजासाठी हेच खरे संरक्षण कवच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, अधिवेशनाचे प्रश्न गंभीर आहेत. साधारण पाच दिवस कामकाज होईल अशी अपेक्षा आहे. पण आज ज्या प्रकारे परिस्थिती आहे, त्यामध्ये प्रश्नांना उत्तर देणारी सरकारच शिल्लक राहिली नाही. तरीसुद्धा आम्ही मुद्दे ठळकपणे मांडणार आणि जनता समोर सत्य ठेवणार आहोत.
ते पुढे म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत विदर्भात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये निरपराध नागरिकांचे बळी गेले आहेत. *“दररोज कुठे ना कुठे वाघाचा हल्ला होतोय. जंगल खरोखर आशीर्वाद आहे की शाप, याचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. पर्यावरणाचा समतोल राखताना मानवी जीवित सतत धोक्यात येत असेल, तर सरकारची भूमिका काय आहे?”* असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
राज्यातील गुन्हेगारी आणि युवकांच्या रोजगाराबाबतही वडेट्टीवारांनी सरकारला धारेवर धरले. “नागपूर आणि मुंबई ड्रग्सच्या अड्ड्यांत रूपांतरित होत आहेत. रोजगाराच्या शोधात विदर्भातून मोठ्या संख्येने तरुण बाहेर जात आहेत. सत्तेत विदर्भाचेच लोक असूनही युवा धोरणांबाबत काय प्रगती झाली? कायदा-सुव्यवस्थेची स्थिती खालावत चालली आहे आणि घोटाळे वाढत आहेत. सरकारचा कारभार हाताबाहेर गेला आहे, असा आरोप त्यांनी केला.









