
नागपूर :माजी मंत्री आणि बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्षा सुलेखा कुंभारे यांच्यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गंभीर आक्षेप घेत पाच कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस बजावली आहे. कुंभारे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन केलेले आरोप “खोटे, निराधार आणि प्रतिष्ठेला धक्का देणारे” असल्याचा मंत्री बावनकुळे यांचा दावा आहे.
बावनकुळे यांच्या वकिलामार्फत पाठवण्यात आलेल्या नोटीशीत कुंभारे यांनी तात्काळ सर्व बदनामीकारक वक्तव्ये मागे घ्यावीत, इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधील व सोशल मीडियावरील त्यांच्या प्रसारणाला पूर्णविराम द्यावा, तसेच सर्व प्लॅटफॉर्मवर सार्वजनिकरीत्या बिनशर्त माफी जाहीर करावी, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे. तसे न केल्यास १५ दिवसांच्या आत पाच कोटी रुपयांची नुकसानभरपाई अदा करावी, असेही नोटीसमध्ये नमूद आहे.
चार डिसेंबर रोजी नागपूर प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत कुंभारे यांनी बावनकुळे यांच्या निवडणूक हस्तक्षेपापासून ते काळ्या पैशांशी संबंध असल्यापर्यंत अनेक गंभीर आरोप केले होते. हे आरोप विविध वृत्तवाहिन्यांवरही प्रसारित झाले. मात्र हे सर्व दावे “पूर्णपणे खोटे आणि दिशाभूल करणारे” असून, त्यामुळे मंत्री बावनकुळे यांच्या सामाजिक-राजकीय प्रतिमेला जबर धक्का पोहोचल्याचे नोटीशीत म्हटले आहे.
नोटीस न पाळल्यास दिवाणी आणि फौजदारी दोन्ही मार्गाने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि संपूर्ण खर्चाची जबाबदारी कुंभारे यांच्यावरच राहील, असा अंतिम इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.









