
नागपूर : भांडेवाडी परिसरात बुधवारी सकाळी घडलेल्या एका नाट्यमय घटनेने नागपूरकरांना अक्षरशः थरकाप उडवला. रहिवासी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये बिबट्या शिरल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली. शहरात हा वन्यप्राणी कसा आला आणि एवढ्या उंच मजल्यावर कसा पोहोचला, याबाबत मात्र अद्याप कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही.
स्थानिकांच्या माहितीनुसार, इमारतीच्या आवारात प्रथम बिबट्याचा वावर दिसला. त्यानंतर रहिवाशांनी तत्काळ हेल्प फॉर अनिमल वेल्फेअर असोसिएशन, नागपूर यांना पाचारण केले. पथकाने घटनास्थळी पोहोचताच बिबट्याची उपस्थिती निश्चित केली आणि लगेचच जिल्हा वन्यजीव अभिसंकक्षक अजिंक्य भटकड तसेच टीटीसी केंद्राला माहिती दिली.
या अनपेक्षित घटनेनं नागपूरच्या शहरी सीमेवर वन्यप्राण्यांच्या वाढत्या हालचालींबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. रहिवासी आणि बिबट्या दोघांच्याही सुरक्षिततेसाठी बचावकार्यात तातडीने सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, बिबट्या शहरात नेमका कसा शिरला, याचा तपास वन विभाग करत आहे.घटनेचा पुढील तपास सुरू आहे.









