
नागपूर : मध्य भारतातील अग्रगण्य सरकारी रुग्णालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरच्या मेडिकलचा चेहरामोहरा बदलू लागला आहे. रुग्णालय आता कॉर्पोरेट दर्जाच्या सुविधा प्रदान करण्याच्या तयारीत असून, रुग्णांच्या नातेवाईकांसाठीही स्वतंत्र विश्रांती केंद्रे उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
नागपूर सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय हे विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह मध्य भारतातील हजारो रुग्णांचे प्रमुख उपचार केंद्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने या रुग्णालयासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे मेडिकलमध्ये अत्याधुनिक उपकरणे, रोबोटिक शस्त्रक्रिया व्यवस्था, नव्याने तयार होणारे आधुनिक ऑपरेशन थिएटर आणि बहुमजली पार्किंगसारख्या सोयी मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण येथे दाखल होतात. मात्र, आतापर्यंत त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांसाठी कोणतीही व्यवस्थित सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे अनेकांना रुग्णालय परिसरातच रात्र काढावी लागत होती. ही अडचण लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी नातेवाईकांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर विश्रांती केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला.
मेडिकल परिसरात ११ विश्रांती केंद्रे तयार होणार असून, प्रत्येक केंद्रात पंखे, गरम पाणी, स्वच्छतागृहे, बसण्याची सोय अशा मूलभूत सुविधा असणार आहेत. प्रत्येक केंद्राची क्षमता साधारण २०० व्यक्तींची असून, एकाच वेळी २२०० नातेवाईकांना येथे थांबता येणार आहे. या नव्या सुविधा सुरू झाल्यानंतर मेडिकल परिसर अधिक सुसज्ज होणार असून, रुग्णांसोबत येणाऱ्या कुटुंबीयांची मोठी गैरसोय दूर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









