
नागपूर– नागपूर महापालिका निवडणुका जवळ येत असताना प्रभाग २३ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच प्रभागातील खुल्या जागेतून तृतीयपंथीय समाजातील राणी ढवळे यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन ही मागणी मांडल्याची माहिती पुढे आली आहे.
राणी ढवळे या किन्नर विकास महामंडळाच्या सदस्य असून सामाजिक कामांमध्ये त्या सक्रिय आहेत. भाजपमध्ये त्यांनी तब्बल १५ वर्षे काम केल्याचा दावा आहे. नवीन आरक्षण रचनेनुसार प्रभाग २३ मधील ‘ड’ ही जागा सर्वसाधारण असून याच जागेसाठी त्यांनी उमेदवारी मागितली आहे. २०१७ मध्ये याच प्रभागातून भाजपचे नरेंद्र बोरकर निवडून आले होते. नव्या आरक्षणानंतर बोरकर यांनीही या जागेसाठी तयारी सुरू केली असून त्यांचीही चर्चा सुरू आहे.
राणी ढवळे म्हणतात की तृतीयपंथीय समाजालाही राजकीय प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. इतर राज्यांनी दाखवलेल्या वाटेवर नागपूरनेही पाऊल टाकावे, असे त्यांचे मत आहे. छत्तीसगडमधील भारतातील पहिल्या तृतीयपंथी महापौर मधू किन्नर यांच्या कार्यातून त्यांना प्रेरणा मिळते.
भाजपकडून उमेदवार निवडीची प्रक्रिया अद्याप सुरू नसली तरी राणी ढवळे यांच्या इच्छापत्रामुळे प्रभाग २३ मधील निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत. सोमवारी त्या शहराध्यक्षांकडे आपला अर्ज देणार असून अंतिम निर्णय पक्षाच्या बैठकीनंतरच होणार आहे.









