नागपूर :ख्यातनाम गायिका श्रेया घोषाल हिने ‘अपने ही रंग में तुझको रंग दे’ या गाण्यापासून सुरुवात करताच संपूर्ण पटांगणात उत्साहाचे उधाण आले. तिच्या मधुर, सुरेल आवाजाने नागपूरकरांना अक्षरशः मोहून टाकले. खासदार सांस्कृतिक महोत्सव-2025 चा दहावा दिवस श्रेयाच्या परफॉर्मन्सने अविस्मरणीय ठरला.नागपूरकरांचा प्रचंड प्रतिसाद-
इश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणाबाहेर दुपारपासूनच लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत संपूर्ण मैदान खच्चून भरले.
अनेकांना प्रवेश न मिळाल्याने बाहेर लावलेल्या एलईडी स्क्रीनवर कार्यक्रम पाहून समाधान मानावे लागले. हजारो नागपूरकरांची गर्दी पाहून या कार्यक्रमाची लोकप्रियता पुन्हा एकदा सिद्ध झाली.
श्रेयाचा सुरेल जलवा-
मंचावर येताच श्रेयाचे स्वागत जल्लोषात झाले.
तिने ‘सुन रहा है ना तू’, ‘तुम क्या मिले’, ‘जादू है नशा है’, ‘दिवानी मस्तानी’, ‘मनवा लागे’, ‘बरसो रे’ अशी लोकप्रिय हिंदी गाणी सादर केली.मराठीत ‘जीव दंगल’, ‘बहरला हा मधुमास’ यांसारखी गाणी गाताच मैदानात टाळ्यांचा कडकडाट झाला.
‘जीव रंगला’ हे गीत गाण्यापूर्वी तिने संगीतकार अजय–अतुल यांच्यावर प्रेमाने भाष्य केले. “ही जोडी अप्रतिम संगीत देणारी आहे. त्यांच्या पहिल्या चित्रपटालाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला,” असे सांगत तिने नागपूरकरांची आणखी मने जिंकली.
गौरव व मान्यवरांची उपस्थिती-
मध्यंतरात नितीन गडकरी यांच्या हस्ते श्रेया घोषाल व किंजल चॅटर्जी यांचा सत्कार झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री, संपादक, महोत्सव कार्यकर्ते व मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून केले.
स्थानिक कलाकारांनी रंगत वाढवली-
कार्यक्रमाची सुरुवात गिटारवादक पियूष भुते यांच्या सुरेल वादनाने झाली.
त्यानंतर प्रलय बँडने श्री गणेश वंदना सादर करून वातावरण भक्तिमय केले.
“धन्यवाद नागपूर” — नितीन गडकरी
गडकरी म्हणाले,दहा वर्षांपासून नागपूरकरांनी महोत्सवावर अपार प्रेम दाखवले आहे. आजही पटांगणात जितके लोक होते, तितकेच लोक बाहेर उभे राहून कार्यक्रम पाहण्याचा प्रयत्न करत होते. ज्यांना आत प्रवेश मिळाला नाही त्यांची मी क्षमा मागतो. पुढील वर्षी सर्वांना जागा मिळेल याची उत्तम व्यवस्था केली जाईल.










