
नागपूर- प्रख्यात पक्षी संशोधक पद्मश्री मारोती चितमपल्ली यांच्या जयंतीपासून ते सुप्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जयंतीपर्यंत दरवर्षी साजरा होणारा ‘महाराष्ट्र पक्षी सप्ताह’ यंदा रामटेक परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने विविध शाळांतील विद्यार्थ्यांसाठी विशेष पक्षीनिरीक्षण उपक्रम राबवण्यात आला.
सकाळच्या गारठ्यात विद्यार्थ्यांनी कॅम्प चेरी फार्म आणि खिंडसी बॅकवॉटर परिसरात फेरफटका मारत विविध पक्ष्यांचे निरीक्षण केले. हातात दुर्बिणी आणि टेलिस्कोप घेऊन विद्यार्थ्यांनी स्थानिक तसेच दूरवरून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचा बारकाईने अभ्यास केला. ब्लॅक आयबिस, ओपनबिल स्टॉर्क, ग्रे हॉर्नबिल, ट्रीपाय, पॅराडाईज फ्लायकॅचर, घुबड, ग्रीन बी ईटर, किंगफिशरच्या प्रजाती तसेच विविध जलपक्षी विद्यार्थ्यांचे खास आकर्षण ठरले.
सीएसी ऑलराउंडरचे निसर्ग अनुभव प्रशिक्षक मनीष मख यांच्या मार्गदर्शनाखाली अजय गायकवाड, संदेश दांडेकर, तुषार काळे, उल्हास बोथरे आणि अंकिता कुंभारे यांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबवला. प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना पक्ष्यांची ओळख, त्यांचे स्वर-वर्तन, स्थलांतराचे कारण, पर्यावरणात त्यांचे योगदान आणि संरक्षणाचे महत्त्व याबद्दल सखोल माहिती दिली.
विद्यार्थ्यांनीही पक्ष्यांचे अधिवास आणि नैसर्गिक वातावरणाचा अभ्यास करत निसर्गाशी जवळीक साधण्याचा अनोखा अनुभव घेतला. या उपक्रमातून पर्यावरणप्रेम, संवर्धनाची जाणीव आणि जैवविविधतेचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर रुजवण्यात आले.
कार्यक्रमाच्या उत्तम नियोजनाबद्दल कॅम्प चेरी फार्मच्या परिवारासोबत सहभागी शाळांच्या शिक्षकांचे मान्यवरांकडून आभार मानण्यात आले.











