
नागपूर: बोलो सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय या सातत्यपूर्ण जयघोषात आणि भक्तांच्या ऊर्जेने द्विगुणित झालेला असा हनुमान चालीसा आणि सुंदरकांड पठणाचा कार्यक्रम खासदार सांस्कृतिक महोत्सवाअंतर्गत जागर भक्तीचा उपक्रमात संपन्न झाला.
आज शनिवारी ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित या कार्यक्रमात सर्वप्रथम खेमराज दमाय यांच्या चमुने हनुमान चालीसा सादर केली आणि त्यानंतर मुन्ना ठाकूर यांच्या चमूने तालबद्ध पद्धतीने सुंदरकांड सादर केले.
तत्पूर्वी ‘ओम’चा मंत्रजाप आणि प्रभू श्रीरामाच्या नामाचा गजर करण्यात आला. त्यांनतर हनुमान चालीसा आणि संस्कृत भाषेतील वाल्मिकी ऋषींनी रचलेले सुंदरकांड अविस्मरणीय पद्धतीने सादर झाले. यावेळी हनुमानाची वेशभूषा करून आलेल्या एका भक्ताने सर्वांचे लक्ष वेधून वेधले.
तत्पूर्वी, संस्कार भारतीच्या अध्यक्ष कांचनताई गडकरी, पुनीत पोद्दार, निळकंठ गुप्ता, जलाराम मंदिराचे प्रमुख नरेंद्र धावडा, विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री गोविंदराव शेंडे, विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत अध्यक्ष सुदर्शन शेंडे, विश्व हिंदू परिषदेचे सह मंत्री राजू पवनारकर, चेतना टांक, खासदार सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. दीपक खिरवडकर, अविनाश घुशे या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांचे स्वागत खेमराज दमाय, नितीन तेलगोटे, राहूल पद्मावत, निधी तेलगोटे यांनी केले.
सुंदरकांडच्या अत्यंत मनमोहक प्रस्तुतीसाठी कांचन गडकरी आणि अनिल सोले यांनी मुन्ना ठाकूर आणि चमूचा सत्कार केला. तसेच, हनुमान चालीसा प्रस्तुतीसाठी खेमराज दमाय आणि चमूचा देखील सत्कार करण्यात आला. श्री हनुमान आरती आणि अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रेणुका देशकर यांनी केले.
रामजी की निकली सवारी वर धरला ठेका:
‘रामजी की निकली सवारी’ ‘हाथी घोडा पालखी’ ‘रामजी चलेना हनुमान के बिना’ यासह अनेक सुप्रसिद्ध भजनांवर अबाल वृद्ध श्रीराम- हनुमान भक्तांनी नृत्य करत ठेका धरल्याचे चित्र दिसून आले. सूर-ताल बद्ध भक्ती गीतांवर डोलत नाचत भक्तांनी श्रीराम -हनुमान स्तुती केली.











