नागपूर : शहरातील देहव्यापार आणि मानवी तस्करीविरोधात क्राइम ब्रांचच्या सोशल सिक्युरिटी विंगने मोठी मोहीम राबवत उमरेड रोडवरील एका लॉजमध्ये धाड टाकली. यात एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली असून, एका ४५ वर्षीय महिलेवर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी दिलेल्या विशेष सूचना लक्षात घेऊन १३ नोव्हेंबर सायंकाळी ४.४० ते १४ नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत पथकाने तपास आणि गस्त वाढवली होती. मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे बहादुरा फाटा, हुडकेश्वर पोलीस हद्दीत येणाऱ्या हॉटेल यशराज इनमध्ये पथकाने मध्यरात्री छापा मारला.
दरम्यान, विद्या धनराज फुलझेले (४५), रा. शारदा लेआउट, खरबी, वाठोदा हिला अल्पवयीन मुलींना ग्राहकांकडे पाठवून पैशासाठी देहव्यापारास भाग पाडत असल्याच्या संशयावरून पकडण्यात आले. या ठिकाणावरून एका अल्पवयीन पीडितेची सुरक्षित सुटका करण्यात आली.
पोलिसांनी छाप्यात ₹२,५०० रोकड, मोबाईल, DVR आणि इतर साहित्य असा अंदाजे ₹२०,७३० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात कलम १४३(४) बीएनएस तसेच पीटा कायद्याच्या कलम ३, ४, ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी, डीसीपी (डिटेक्शन) राहुल मकनिकर आणि एसीपी अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पीआय राहुल शिरे, PSI प्रकाश माठणकर आणि त्यांच्या पथकाने संयुक्तरीत्या केली.










