Published On : Wed, Nov 12th, 2025
By Nagpur Today Nagpur News

महापालिका निवडणुकीच्या आरक्षणामुळे राजकीय दिग्गजांवर संकट;गुड्द्धे, भोयर, बोरकर यांना धक्का !

तिवारी, पांडे, मेश्राम, कुकडे सुरक्षित
Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी आरक्षणाची लॉटरी जाहीर होताच अनेक दिग्गजांचे राजकीय गणित बदलले आहे. मागील निवडणुकांमध्ये प्रभाव दाखवणाऱ्या प्रफुल्ल गुड्डे, छोटू भोयर आणि बाल्या बोरकर यांसारख्या वरिष्ठ नगरसेवकांना यंदा आरक्षणाचा फटका बसला आहे. दुसरीकडे माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी स्थायी समिती सभापती आभा पांडे, अनुसूचित जाति आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम आणि भाजपचे वरिष्ठ नगरसेवक बंटी कुकडे यांचे प्रभाग मात्र सुरक्षित राहिल्याने त्यांचा पुन्हा महापालिकेचा मार्ग मोकळा झालेला दिसतो.

यंदाच्या लॉटरी प्रक्रियेत 151 जागांसाठी 38 प्रभागांमध्ये आरक्षण निश्चित करण्यात आले असून, 28 सीट्सचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे. काही ठिकाणी महिलांसाठी राखीव जागा पुरुषांसाठी खुल्या झाल्या आहेत, तर काही ठिकाणी पुरुष प्रवर्गातून महिलांना संधी मिळणार आहे. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये नव्या राजकीय संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे.

Gold Rate
12 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,23,500 /-
Gold 22 KT ₹ 1,14,900 /-
Silver/Kg ₹ 1,55,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भाजपचे सुरक्षित चेहरे-
विकी कुकरेजा, प्रवीण भीसीकर, महेंद्र धनविजय, संदीप जाधव, भूषण शिंगणे, परिणीता फुके, दिव्या चुरडे, प्रगती पाटिल, वन ठाकरे, प्रदीप पौहाणे, चेतना टांका, संदीप गवई, अविनाश ठाकरे आणि चिंटू झलके हे प्रभाग आरक्षण बदलानंतरही सुरक्षित असल्याचे समजते.

ग्वालबंशी बंधू आमने-सामने-
प्रभाग क्रमांक 12 मध्ये आरक्षणाच्या फेरबदलामुळे ग्वालबंशी बंधूंची थेट लढत होण्याची शक्यता आहे. 12क प्रभाग ओबीसी महिलांसाठी राखीव झाल्याने हरीश ग्वालबंशी यांना उमेदवारी गमवावी लागू शकते, मात्र सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातील 12ड प्रभागातून विक्रम ग्वालबंशींच्या विरोधात ते लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

SC आरक्षणाचा परिणाम-
नागेश सहारे, प्रमोद तभागे, अभय गोटेकर, विजय चुटेले आणि शकुंतला पारये यांच्या सीट्सवर आरक्षणाचा परिणाम झाला आहे. त्याउलट मीनाक्षी तेलगोटे आणि वंदना भगत यांच्या सीट्स सुरक्षित राहिल्या आहेत. बसपाचे जितेंद्र घोडेस्वार आणि कसीसच्या स्नेहा निकोसे यांना मात्र नवीन राजकीय पर्याय शोधावे लागणार आहेत.

हिरणवार आणि पाटील यांचे समीकरण बदलले-
भाजपचे वरिष्ठ नगरसेवक सुनील हिरणवार यांच्या प्रभाग 15अ वर महिला आरक्षण लागू झाल्याने त्यांना आता ओबीसी पुरुष प्रवर्गातील 15ब प्रभागातून संधी शोधावी लागेल. तर प्रभाग 14ड सर्वसाधारण पुरुष प्रवर्गात प्रगती पाटील यांना उमेदवारी मिळवण्यासाठी जोर लावावा लागणार आहे.

बाल्या बोरकर अडचणीत-
पूर्व स्थायी समिती अध्यक्ष बाल्या बोरकर यांच्या प्रभाग 23ब वर महिला आरक्षण लागू झाल्याने त्यांना नवीन प्रभाग शोधावा लागेल. तर प्रभाग 31 मध्ये काँग्रेसचे सतीश होले आणि छोटू भोयर आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

आपत्ती नोंदविण्याची अंतिम तारीख 24 नोव्हेंबर-
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार लॉटरी प्रक्रियेबाबत आक्षेप किंवा सुचवणी 17 ते 24 नोव्हेंबरदरम्यान दाखल करता येणार आहेत. या सुनावणीनंतर अंतिम आरक्षण निश्चित करण्यात येईल.

एकंदरीत, आरक्षणाच्या या बदलांमुळे नागपूरच्या महानगरपालिका निवडणुकीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे, तर अनेक दिग्गजांना आपली राजकीय गणिते नव्याने मांडावी लागणार आहेत.

Advertisement
Advertisement