
नागपूर : खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या संकल्पनेतून आयोजित ‘खासदार सांस्कृतिक महोत्सवा’ अंतर्गत बुधवारी सकाळी ‘जागर भक्तीचा’ कार्यक्रम पार पडला. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात हरिपाठ पठण, भजन आणि कीर्तनाच्या स्वरांनी वातावरण विठ्ठलमय झाले.
‘बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’च्या जयघोषात वारकरी बंधु-भगिनी तुळशी वृंदावन डोक्यावर घेत, हातात टाळ-चिपळ्या घेऊन हरिनामात तल्लीन झाले. कुणी फुगड्या खेळत तर कुणी रिंगण करून ठेका धरत होते. ‘रामकृष्ण हरी’, ‘ज्ञानदेव तुकाराम’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला.
विठ्ठल–रखुमाईच्या वेषातील कलाकारांनी सर्वांचे लक्ष वेधले, तर संस्कार भारतीच्या अध्यक्षा कांचनताई गडकरी यांनीही भक्तांसोबत फुगडी खेळत आनंद साजरा केला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. या वेळी ह.भ.प. अनिल महाराज अहेर, ह.भ.प. केतन दरणे, मयूर महाराज दरणे, अरुण महाराज सातफळे, भिषिकर महाराज, कबीर मठाचे मुनींद्रनाथ महाराज तसेच खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. दीपक खिरवडकर आणि अविनाश घुशे प्रमुख उपस्थित होते.
सर्व मान्यवरांचे स्वागत विश्वनाथ कुंभळकर, प्रदीप अवचट, दाउदखानी आणि सोमु देशपांडे यांनी केले. सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले. शेवटी आरती व अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.










