Published On : Thu, Nov 6th, 2025
By Nagpur Today Nagpur News

‘अखंड घुंगरू नाद 2025’: नागपुरात 9 नोव्हेंबरला 12 तासांचा शास्त्रीय नृत्य महायज्ञ!

देशभरातील 220 कलाकारांची सहभागिता
Advertisement

नागपूर : भारतीय शास्त्रीय नृत्य परंपरेचा गौरवशाली ठेवा जपण्यासाठी नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरतर्फे ‘अखंड घुंगरू नाद 2025’ हा सलग 12 तासांचा नृत्य महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम येत्या रविवारी, 9 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 वाजता धरमपेठ येथील नटराज आर्ट अँड कल्चर सेंटर, रजत महोत्सव बिल्डिंग येथे नटराज पूजनाने सुरू होणार आहे.

या महायज्ञात देशभरातील 45 संस्थांचे तब्बल 220 कलाकार सहभागी होणार असून नागपूरसह विविध राज्यांतील शास्त्रीय नृत्यगुरूही आपली कला सादर करणार आहेत, अशी माहिती नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरचे प्राचार्य डॉ. रवींद्र हरिदास यांनी दिली.

Gold Rate
06Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,20,300 /-
Gold 22 KT ₹ 1,11,900 /-
Silver/Kg ₹ 1,48,700/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या उपक्रमाला धरमपेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. उल्हास औरंगाबादकर, सचिव सुरेश देव आणि समन्वयक अॅड. संजीव देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

डॉ. हरिदास म्हणाले, “मागील चार वर्षांपासून या उपक्रमाला नर्तक आणि रसिक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध शास्त्रीय नृत्य प्रकारांचे एकाच व्यासपीठावर दर्शन घडविणे, हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे.”

या दिवसभर चालणाऱ्या महायज्ञात भरतनाट्यम, कथ्थक, कथकली, कुचीपुडी, ओडिसी, मणिपुरी, मोहिनीअट्टम आणि सत्रिया या आठही भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारांचे सादरीकरण होणार आहे. नागपूर, अमरावती, चंद्रपूर, केरळ, मणिपूर आणि झांसी येथील कलाकार या सादरीकरणात सहभागी होतील.

नागपुरातील नामांकित नृत्यगुरूंमध्ये श्रीमती ललिता हरिदास (कथक), श्रीमती रत्नम् जनार्दनम (मोहिनीअट्टम), श्रीमती माडखोलकर (भरतनाट्यम) आणि डॉ. मोहन बोडे (ओडिसी) हे आपली कला सादर करणार आहेत.

या कार्यक्रमाला उपस्थित राहून शास्त्रीय नृत्यकलेचा आनंद घ्यावा आणि कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेत डॉ. सदानंद बोरकर आणि संयोजक अवंती काटे उपस्थित होते.

Advertisement
Advertisement