
नागपूर : नागपुरात शनिवारी सकाळी एक भीषण प्रकार घडला. प्रवाशांनी गच्च भरलेल्या एसटी बसमध्ये अचानक धूर निघू लागल्याने अफरातफरी माजली. क्षणभरात बसमध्ये घबराट पसरली आणि प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी खिडक्यांतून उड्या मारत बाहेर पडले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना डीसीपी झोन-२ कार्यालयाजवळ घडली. नागपूरहून जात असलेल्या या एसटी बसमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने धूर पसरू लागला. काही क्षणांत प्रवाशांचा जीव घाबरून गेला. चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि इंजिन बंद केले.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, बस थांबताच प्रवाशांनी घाईघाईने बाहेर पळ काढला. काहींनी तर थेट खिडकीतून उड्या मारल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मोठी दुर्घटना टळली.
आग नियंत्रणात आणल्यानंतर बसचे इलेक्ट्रिकल सिस्टिम तपासण्यात आली असून प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडल्याचे समोर आले आहे. यानंतर विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी संबंधित बस तात्काळ तपासणीसाठी डेपोमध्ये परत बोलावली आहे.
स्थानिकांच्या तत्परतेमुळे आणि चालकाच्या प्रसंगावधानामुळे “लाल परी” राख होण्यापासून वाचली.








