नागपूर : पारडी परिसरात घरगुती वाद चिघळल्याने मुलानेच पित्याची हत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना मंगळवारी (२८ ऑक्टोबर) घडली. ही घटना उघड होताच परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक आणि आरोपी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणांवरून वाद सुरू होते. सोमवारी मध्यरात्री पुन्हा दोघांमध्ये तीव्र वाद झाला. या संतापाच्या भरात मुलगा पवन आर्मोरिकर उर्फ नेगी (रहिवासी भांडेवाडी) याने तीक्ष्ण शस्त्राने वडिलांवर वार करत त्यांची हत्या केली.
हत्या केल्यानंतर पवनने कोणत्याही दडपणाशिवाय थेट पारडी पोलिस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत खुनाचा गुन्हा नोंदवून अटक केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवले असून, नेमका वाद कशावरून झाला याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे पारडी परिसरात भीतीचे आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे.










