नागपूर : यूएईत गरजू आणि स्थलांतरित कामगारांसाठी परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देणारे आणि केवळ ३० दिरहॅम (सुमारे ६८० रुपये) शुल्क घेऊन उपचार करणारे भारतीय मूळचे डॉक्टर डॉ. संजय पैठणकर यांचा ‘नागपूर टुडे विभूती पुरस्कार २०२५’ ने गौरव करण्यात आला.
नागपूरच्या घोंगली येथील Mount Litera Zee School मध्येही पैठणकर यांनी भेट दिली.यादरम्यान त्यांनी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृह परिसरात वृक्षारोपण केले.
या भव्य सोहळ्यासाठी डॉ. पैठणकर विशेषतः यूएईहून नागपूरला आले होते. त्यांच्या स्वागतासाठी निशांत गांधी यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांनी त्यांच्या कार्याची मनःपूर्वक प्रशंसा केली.
यूएईतील परवडणाऱ्या आरोग्यसेवेचा चेहरा,‘राईट हेल्थ ग्रुप’-
डॉ. पैठणकर हे यूएईतील प्रसिद्ध ‘राईट हेल्थ ग्रुप’ (Right Health Group) या संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख आहेत. १९८८ मध्ये केवळ ७ डॉलर आणि ५,००० रुपये घेऊन अबुधाबीमध्ये दाखल झालेले हे डॉक्टर आज यूएईतील सर्वात मोठ्या व्हॅल्यू हेल्थकेअर नेटवर्कचे नेतृत्व करत आहेत.
गेल्या तीन दशकांत त्यांनी हजारो कामगारांसाठी सुलभ, नैतिक आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली आहे.मी श्रीमंत झालो, पण रुग्णांकडून नाही — त्यांच्या आशीर्वादातून आणि विश्वासातून,” असं ते नेहमी सांगतात.नागपूरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलेल्या डॉ. पैठणकर यांच्या वडिलांनी तेथेच पॅथॉलॉजी प्राध्यापक म्हणून सेवा केली. शिक्षणानंतर त्यांनी मुंबईतील जसलोक रुग्णालयात काम केलं आणि १९८८ मध्ये यूएईला प्रस्थान केलं.
१९९३ मध्ये त्यांनी अजमान येथे ‘सनाया मेडिकल क्लिनिक’ ची स्थापना केली. “सनाया” म्हणजे औद्योगिक परिसर, आणि याच भागातील कामगारांसाठी त्यांनी पहिली आरोग्य सुविधा सुरू केली.
आज त्यांच्या ५७ क्लिनिकमध्ये दररोज तब्बल २,००० रुग्णांना उपचार मिळतात, तर ६०० पेक्षा अधिक कर्मचारी या सेवामिशनशी जोडलेले आहेत.
मी पैसा नाही, हेतू कमावला —
डॉ. पैठणकर यांचा ठाम विश्वास आहे.मी कधी पैशाच्या मागे धावलो नाही. माझं ध्येय नेहमीच गरजूंपर्यंत उपचार पोचवणं हेच राहिलं. योग्य हेतू ठेवलात, तर यश आणि पैसा आपोआप मिळतात.”
गेल्या तीन दशकांत त्यांनी कधीही कर्ज घेतलं नाही. उलट विश्वासू गुंतवणूकदारांसह भागीदारी करून त्यांनी विस्तार साधला आणि नवनवीन क्लिनिक सुरू केली.
नागपूरशी असलेलं आत्मीय नातं-
नागपूरमध्ये आपल्या जुन्या शाळेला भेट देताना डॉ. पैठणकर भावुक झाले.हीच माझ्या स्वप्नांची पाळंमुळं आहेत,” असे ते म्हणाले.‘नागपूर टुडे’तर्फे सन्मान स्वीकारताना त्यांनी सांगितले.आज मी यूएईतील हजारो कामगारांच्या आरोग्याचे रक्षण करतोय, पण या सेवाभावाची प्रेरणा माझ्या जन्मभूमी नागपूरकडूनच मिळाली.”
डॉ. पैठणकर यांच्या सेवाभावी, कर्तृत्ववान आणि प्रेरणादायी प्रवासाची दखल घेत ‘नागपूर टुडे’ने त्यांना ‘विभूती पुरस्कार २०२५’ ने सन्मानित केले.त्यांचा प्रवास दाखवतो.जेव्हा हेतू शुद्ध असतो, तेव्हा सेवा हीच सर्वात मोठी संपत्ती ठरते.