नागपूर : राज्याच्या उपराजधानीत ‘नागपूर टुडे’ न्यूज तर्फे प्रथमच आयोजित करण्यात आलेला ‘नागपूर टुडे विभूती पुरस्कार २०२५’ हा प्रतिष्ठेचा सोहळा मंगळवारी (१५ ऑक्टोबर) संध्याकाळी हॉटेल रॅडिसन ब्लू येथे मोठ्या थाटात पार पडला. या भव्य कार्यक्रमाला समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
अमृता फडणवीस यांची प्रभावी उपस्थिती, ‘नागपूर टुडे’चं कौतुक-
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि अॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्ष अमृता फडणवीस उपस्थित होत्या. त्यांनी ‘नागपूर टुडे’च्या कार्याचे मनापासून कौतुक करत म्हटलं,मी आणि देवेंद्रजी दररोज ‘नागपूर टुडे’ वाचतो. नागपूरच्या बातम्यांबाबत सर्वाधिक विश्वासार्ह माध्यम म्हणजे ‘नागपूर टुडे’च आहे.”
तसंच, ‘नागपूर टुडे’ने १४ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केल्याबद्दल त्यांनी संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं आणि पुरस्कारप्राप्त सर्व विजेत्यांचेही विशेष कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात हल्दीराम्स समूहाचे चेअरमन शिवकिशन अग्रवाल यांना पहिला ‘विभूती पुरस्कार २०२५’ देण्यात आला. नागपूरला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक नकाशावर स्थान मिळवून देण्यासाठी त्यांच्या योगदानाची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. दर्जेदार आणि सर्वसामान्यांसाठी परवडणारी आरोग्यसेवा पुरविण्याच्या कार्यासाठी डॉ. संजय पैठणकर यांनाही विशेष सन्मानपत्र प्रदान करण्यात आलं.
विविध क्षेत्रांतील विभूतींचा सन्मान, सभागृहात टाळ्यांचा गजर-
उद्योग, शिक्षण, आरोग्य, कला, समाजसेवा आणि नवोन्मेष या क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींना या सोहळ्यात सन्मानित करण्यात आलं. उपस्थितांनी उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात विजेत्यांचं स्वागत केलं.
‘नागपूर टुडे’च्या माध्यमातून उत्कृष्टतेचा नवा अध्याय-
‘नागपूर टुडे विभूती पुरस्कार २०२५’च्या माध्यमातून या ई-न्यूज पोर्टलने मध्य भारतातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करत समाजातील सकारात्मकतेचा नवा अध्याय लिहिला आहे.
या सोहळ्याचं आयोजन रोशन रिअल इस्टेट प्रा. लि. यांच्या प्रस्तुतीने, पिनॅकल टेलीसर्व्हिसेस प्रा. लि. यांच्या सौजन्याने आणि विदर्भ इन्फोटेक प्रा. लि. (VIPL) यांच्या सहकार्याने करण्यात आलं होतं.