नागपूर : मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली सावनेर येथील एका तरुणीची तब्बल साडे २५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी चार आरोपींविरोधात फसवणूक आणि कटकारस्थानाचा गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार समध्दी राजू पराते ही एमबीबीएसचं शिक्षण घेऊ इच्छित होती. एका वृत्तपत्रात तिने नागपूरस्थित पीपललिंक प्लेसमेंट प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचा जाहिरात पाहिला, ज्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचा दावा करण्यात आला होता.
यानंतर ती आरोपी अतुल रमेशराव इंगोले याला भेटली. त्याने सांगितले की आरजेएस कॉलेज, कोपरगाव यांचा कोलंबस सेंट्रल युनिव्हर्सिटी (अमेरिका) सोबत करार आहे. तसेच आरोपींनी वेंकट रेड्डी (हैदराबाद) आणि उमंग पटेल (अहमदाबाद) यांना अनुक्रमे विद्यापीठाचे डायरेक्टर आणि सीईओ म्हणून ओळख करून दिले.
पीडितेकडून नोंदणी, प्रशिक्षण, वसतिगृह आणि फी या विविध कारणांखाली रोख व ऑनलाइन एकूण २८ लाख ६० हजार रुपये घेतले गेले. आरोपींनी बनावट पावत्या, मार्कशीट आणि विद्यार्थी आयडी ईमेलद्वारे पाठवून तिचा विश्वास संपादन केला.
तथापि, काही दिवसांनी संशय आल्याने पीडितेने प्रवेश रद्द करण्याची मागणी केली. तेव्हा आरोपींनी फक्त ३ लाख रुपये परत केले, मात्र उर्वरित साडे २५ लाख रुपये बेकायदेशीररीत्या ठेवून घेतले.
सक्करदरा पोलिसांनी या प्रकरणात अतुल इंगोले, वेंकट रेड्डी, उमंग पटेल आणि पीपललिंक प्लेसमेंट कंपनी यांच्याविरोधात फसवणूक व कटकारस्थानाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.