
या परिस्थितीचा विचार करून २१ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. विशेषतः शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये जोरदार सरींची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूरमध्येही हलक्याफुलक्या सरी कोसळतील. परंतु सोलापूर जिल्ह्यासाठी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा विशेष इशारा देण्यात आला आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे ढगांचा गडगडाट होत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता आहे. तर परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत जोरदार सरींसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे.
धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. तर जळगाव, नाशिक आणि अहमदनगरमध्ये पावसासह विजांचा कडकडाट होण्याची चिन्हे असून, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भ प्रदेशासाठी हवामान खात्याने सर्वाधिक इशारा दिला आहे. अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि वाशिम या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज आहे.
एकंदरीत, उद्या महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढेल आणि काही ठिकाणी वादळाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे आणि सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे, असे हवामान खात्याचे आवाहन आहे.









