
मुंबई : राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी हालचाल सुरू झाली आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम आता वेगाने अंतिम टप्प्यात पोहोचत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारी 2026 पूर्वी निवडणुका घेणे बंधनकारक असल्याने प्रशासन तयारीला लागले आहे.
मतदार यादी जाहीर करण्याचा कार्यक्रम :
8 ऑक्टोबर 2025 – प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल.
8 ते 14 ऑक्टोबर 2025 – हरकती आणि सूचना स्वीकारल्या जातील.
27 ऑक्टोबर 2025 – मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर होईल.
ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची प्रभागरचना पूर्ण केली आहे. आता राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना नवीन मतदार यादी तयार करण्याचे आदेश दिले आहेत. ही यादी 1 जुलै 2025 च्या विधानसभा मतदार यादीवर आधारित असेल.
निवडणुका कधी?
मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2025 मध्ये जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता आहे.
तर जानेवारी 2026 मध्ये महापालिका निवडणुका पार पडतील.
या प्रक्रियेत भंडारा, गोंदिया, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांचा समावेश होणार नाही.
या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच ग्रामीण व शहरी सत्तेसाठीची मोठी चुरस असते. त्यामुळे सर्वच पक्षांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन सुरू केले आहे. प्रचाराची रंगत वाढणार हे निश्चित आहे.









