नागपूर : नागपूर जिल्ह्यातील पाच महत्वाच्या तीर्थक्षेत्रांना राज्य सरकारकडून ‘ब’ वर्गाचा दर्जा मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार असून सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विकासाला नवे बळ मिळेल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झालेल्या तीर्थक्षेत्रांमध्ये श्री क्षेत्र हनुमान मंदिर (खडगाव), श्री भवानी मंदिर (वडोदा, ता. कामठी), श्री मुकतेश्वर देवस्थान (भुगाव, ता. कामठी), श्री शक्तिमाता भवानी तीर्थक्षेत्र (देवमुंढरी, ता. मौदा) आणि श्री क्षेत्र बल्याची पहाडी (निहारवाणी, ता. मौदा) यांचा समावेश आहे.
या निर्णयामुळे शासन निधीतून रस्ते, प्रकाशयोजना, पिण्याचे पाणी, पार्किंग व निवास व्यवस्था यांसारख्या सुविधा उभारल्या जाणार आहेत. भाविकांसाठी सोयी वाढल्याने पर्यटनाचा विस्तार होईल आणि स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल पालकमंत्री बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले. “भाविकांच्या श्रद्धेला बळ मिळण्यासोबतच नागपूर जिल्हा धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे झळकणार आहे,” असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.