नागपूर: मानकापूर उड्डाणपुलावर शुक्रवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. शालेय विद्यार्थ्यांची व्हॅन समोरून येणाऱ्या बसला धडकली, ज्यामुळे अनेक मुले गंभीर जखमी झाली. या अपघातात १३- १४ वर्षीय शानवी खोब्रागडे हिचा मृत्यू झाला. शानवी भवन्स शाळेची विद्यार्थिनी होती.
अपघातानंतर पादचारी आणि नागरिकांनी जखमी विद्यार्थ्यांना चुरगळलेल्या व्हॅनमधून बाहेर काढले. जखमी मुलांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. या अपघातात काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे, तर केवळ दोन विद्यार्थी शुद्धीत होते.
व्हॅन चालकाला स्टीअरिंगवर जोरदार धक्का बसल्यामुळे डोक्याला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली असून त्यावर उपचार सुरू आहेत. धडक बसलेली बस बोखारा येथील नारायणा विद्यालयाची होती आणि ती शहरातून विद्यार्थ्यांना आणण्यासाठी येत होती. बसचालक आणि दोन महिला सहाय्यक सुखरूप बचावले. बसचालकाच्या म्हणण्यानुसार, व्हॅन चालक वेगात होता आणि अचानक लेन सोडल्याने समोरासमोर धडक झाली.
गेल्या काही महिन्यांपासून मानकापूर स्टेडियम ते फाऱस दरम्यानचा उड्डाणपुलाचा एक भाग दुरुस्तीमुळे बंद असल्याने वाहतूक एका लेनवरून दोन्ही बाजूंनी सुरू होती. अपघातामुळे उड्डाणपुलावर जवळपास तासभर वाहतूक ठप्प झाली. अपघाताच्या वेळी घटनास्थळी वाहतूक पोलिस उपस्थित नव्हते.
View this post on Instagram