नागपूर : जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या मोठ्या एटीएम फोडीचा गुन्हा अखेर उघडकीस आला आहे. एस.बी.आय. बँकेच्या पाटणकर चौकातील एटीएममधून तब्बल ८ लाख १२ हजार ४०० रुपयांची रोकड चोरून नेण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी उत्तर प्रदेशातील खुर्शीद अहमद निसार अहमद (वय ५५) याला अटक केली असून, त्याचे चार साथीदार फरार आहेत, अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.
घटना कशी घडली?
दि. ४ सप्टेंबर रोजी पहाटे २.३० वाजता अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडले. नंतर बँकेचा क्लोजिंग बॅलेन्स व मशीनमधील कॅश तपासली असता एटीएममधून ८,१२,४०० रुपयांची रोकड चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांची कारवाई-
फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर परिमंडळ ५ चे मा. उपआयुक्त निकेतन कदम, सहायक पोलीस आयुक्त सत्यवान बंडीवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. सपोनी आशीष मोरखेडे आणि पोउपनी मारोती जंगीलवाड यांच्या टीमने तांत्रिक तपास, सीडीआर व इतर पुराव्यांच्या आधारे आरोपी खुर्शीद अहमदला अटक केली. त्याच्या घरातून १७,४०० रुपये जप्त करण्यात आले.
आरोपीकडून महत्त्वाचे उघड-
तपासादरम्यान आरोपीने कबुली दिली की हा गुन्हा त्याने आपल्या चार साथीदारांसोबत मिळून केला. त्याच्यावर याआधी मुंबई आणि ठाणे परिसरात २५ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
पुढील तपास सुरू-
सध्या पोलिसांनी खुर्शीद अहमदला न्यायालयात हजर करून १४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळवली आहे. फरार चार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके कार्यरत आहेत. या कारवाईत सहभागी झालेल्या सर्व अधिकाऱ्यांचे आणि अंमलदारांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. या तपासामुळे नागपूर पोलिसांच्या चपळाईचे आणि तांत्रिक कौशल्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.