नागपूर : नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेअंतर्गत सामाजिक सुरक्षा शाखेने (SSB) “ऑपरेशन शक्ती” अंतर्गत भिलगाव येथील एका ओयो हॉटेलवर धाड टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. ही कारवाई ९ सप्टेंबर रोजी करण्यात आली.
ही कारवाई एम.आर. ओयो हॉटेल, घर क्रमांक ४०, वार्ड क्रमांक २, भिलगाव, जायसवाल बार चौक येथे करण्यात आली. आरोपी मनीषपाल सुधर्शन राजपूत (४९) व त्यांची पत्नी सिमरानी राजपूत (५०) यांच्यासह सोनू उर्फ सय्यद अली या साथीदारावर आर्थिक फायद्यासाठी देहविक्री व्यवसाय चालवण्याचा आरोप आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून एक पीडित महिलेला सुरक्षित बाहेर काढले. यावेळी रोख रक्कम १,५०० रुपये, चार मोबाईल फोन, डीव्हीआर आणि अन्य साहित्य असे एकूण १.५१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी यशोधरानगर पोलिस ठाण्यात बीएनएस कलमांनुसार तसेच अनैतिक मानव व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पुढील चौकशीसाठी यशोधरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.