नागपूर :गणेशपेठ परिसरातील ग्रॅनाईट व्यापाऱ्याच्या घरी झालेल्या २१ लाखांच्या चोरीचा उलगडा क्राईम ब्रांचने केला असून, आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे. हा आरोपी घरगडी बनून व्यापाऱ्याच्या घरी शिरला होता आणि विश्वास जिंकून मोठा हात साफ करून पळाला होता.
आरोपीने ‘अनाथ’ सांगून मिळवला विश्वास-
मिळालेल्या माहितीनुसार, अटकेत गेलेला आरोपी राजा चौधरी (रा. नदिया, प. बंगाल) आहे. त्याने बनावट आधारकार्ड तयार करून गणेशपेठमध्ये राहणाऱ्या ग्रॅनाईट व्यापारी अजित सारडा यांच्या घरी नोकरी मिळवली होती. स्वतःला अनाथ असल्याचं सांगून त्याने घरच्यांचा विश्वास संपादन केला आणि तब्बल तीन महिने तेथे काम केलं.
या काळात त्याने संपूर्ण घराची रेकी केली. अखेर ऑगस्ट महिन्यात योग्य संधी साधून ३८७ ग्रॅम सोने, हिरेजडित दागिने आणि १.७० लाख रुपयांची रोकड घेऊन तो गावाकडे पसार झाला.
सीसीटीव्हीच्या आधारे शोध-
घटनेनंतर पोलिसांना आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले. आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी चोरीनंतर घेतलेला नवा मोबाइल इतराला देऊन स्वतःचा मागोवा लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, क्राईम ब्रांचच्या संयुक्त पथकाने केवळ रेल्वे तिकीटाच्या आधारावर शोध घेत, त्याला बांगलादेश सीमेजवळील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील सोडपूर गावातून पकडलं.
दागिने विकले, हिरे वेगळे काढले-
आरोपीने चोरी केलेल्या दागिन्यांमधून हिरे वेगळे काढून ठेवले आणि सोने कौड्यांच्या किमतीत विकले होते. पोलिसांनी त्याच्याकडून ११० ग्रॅम हिरेजडित दागिने, तीन मोबाइल, एक टॅब आणि रोकडसह एकूण १७ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपीला पुढील कारवाईसाठी गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.