नागपूर: एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत तीन वेगवेगळे गुन्हे उघडकीस आणत पाच आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईतून गांजा, दारू, वाहने व चोरीचा माल असा एकूण ₹1,38,440 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पहिल्या प्रकरणात सेनापती नगर, दिघोरी येथील रोमंच रविंद्र रंगारी (20) याच्या ताब्यातून चोरीचा ऑस्कर एलईडी टीव्ही (₹15,000) व हिरो होंडा सीडी-100 डिलक्स मोटारसायकल (₹30,000) जप्त करण्यात आली.
अनंत चतुर्दशी निमित्त शासकीय ड्राय डे जाहीर करण्यात आला होता. त्या दिवशी गस्तीदरम्यान पोलिसांनी भिम नगर परिसरातून अमोल मोतीराम इंगोले (32) यास पकडले. त्याच्या ताब्यातून ५९७ सीलबंद देशी-विदेशी दारूच्या बाटल्या व एक अॅक्टीव्हा स्कूटर (MH-40 BU-1597) हस्तगत करण्यात आली. या मालाची किंमत ₹93,440 इतकी आहे.
दरम्यान, वैशाली नगर, हिंगणा रोड येथील सराईत व हद्दपार आरोपी निलेश उर्फ ‘क्लोमेक्स’ भिमराव मांडसकर (29) यास दोन साथीदारांसह अटक करण्यात आली. तपासात त्याच्याकडून गांजा व इतर साहित्य मिळून एकूण जप्तीची किंमत ₹1.38 लाख झाली.
ही संपूर्ण कारवाई परिमंडळ-1 चे उपायुक्त सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी व सहाय्यक पोलिस आयुक्त (एमआयडीसी) सतीश गुक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोकुळ महाजन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात संजय बनसोड, ओमप्रकाश भारतीय, धर्मेंद्र यादव, आशीष पौनिकर, विकांत देशमुख व वशिष्ठ इंगळे यांचा समावेश होता.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.