गडचिरोली – अतिवृष्टीमुळे पुराच्या संकटात सापडलेल्या गडचिरोली जिल्ह्यात राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) नागपूरच्या जवानांनी धाडसी बचाव कार्य करीत अनेकांचे प्राण वाचवले. कठीण परिस्थितीत संयम, साहस आणि वेगवान निर्णयक्षमतेच्या जोरावर दलाने केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राज्य सरकारने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या धर्तीवर २०१६ मध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना केली. नागपूर आणि धुळे येथे त्याच्या तुकड्या आहेत. याच दलातील नागपूरची टिम क्रमांक ०२ ही १८ जुलै ते ३० ऑगस्टदरम्यान गडचिरोलीत तैनात होती. या काळात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणे व तलाव पूर्ण भरले. सततच्या विसर्गामुळे नद्या-नाले धोकादायक पातळीवर वाहत होते. गावांचा संपर्क तुटला आणि पुराचा मोठा धोका निर्माण झाला.
पहिला बचाव : नदीत पडलेल्या व्यक्तीचा जीव वाचवला-
१९ जुलै रोजी संध्याकाळी ७.१५ वाजता गडचिरोलीतील कठाणी नदीत एक इसम पुलावरून खाली पडला. डी.डी.एम.ओ. कार्यालयातून मिळालेल्या तातडीच्या संदेशावरून SDRF च्या सब-टिमने अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक एस. बी. चौधरी व उपनिरीक्षक एस. एस. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी अंधाऱ्या रात्री धाडस दाखवत नदीत अडकलेल्या व्यक्तीचा जीव वाचवला आणि त्याला सुरक्षितपणे रुग्णालयात दाखल केले.
दुसरा बचाव : विद्यार्थ्यांना पोहोचवली UPSC परीक्षेला-
२० ऑगस्ट रोजी भामरागड तालुक्यातील परलागोटा परिसरात पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली. या परिस्थितीत UPSC परीक्षेला जाणाऱ्या तीन मुली आणि दोन मुलांची अडचण निर्माण झाली होती. पोलीस उपनिरीक्षक एस. जी. भंडारे यांच्या नेतृत्वाखाली SDRF जवानांनी बोटीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे हेमलकसा येथे पोहोचवले. त्यामुळे त्यांना वेळेवर परीक्षा देता आली.
तिसरा बचाव : गर्भवती महिलेला दिले जीवदान-
त्याच दिवशी सकाळी ४ वाजता मौजा हिंदवाडा येथील गर्भवती महिला सौ. अर्चना विकास तिम्मा यांना प्रसववेदना सुरू झाल्या. पामुलगौतम नदीचा पुर ओलांडणे अशक्य असतानाही SDRF च्या जवानांनी बोटीने नदी पार करून महिलेचा सुरक्षित बचाव केला. त्यांना भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला.
या सर्व बचाव मोहिमांमध्ये दलाचे समादेशक बच्चन सिंह आणि सहायक समादेशक कृष्णा सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी यशस्वीपणे कार्य केले. दलातील पोलीस अधिकारी व जवानांचे अभिनंदन करताना सिंह यांनी सांगितले की, “गडचिरोलीतल्या कठीण परिस्थितीत SDRF ने दाखवलेले धैर्य आणि शिस्त भविष्यातील प्रत्येक आपत्ती व्यवस्थापनात आदर्श ठरेल.