नागपूर:नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने एका दुहेरी हत्येच्या प्रकरणात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शुक्रवारी (२९ ऑगस्ट २०२५) न्यायमूर्ती श्री. दिनेश सुराना यांनी हा निर्णय दिला.
सक्करदरा पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या गुन्हा क्रमांक ७५/२०२० मध्ये आरोपी जयंत यशवंतराव नाटेकर (वय ६२, रा. देशमुख अपार्टमेंट, दत्तात्रय नगर, नागपूर) याच्यावर त्याची पत्नी व पत्नीच्या मामाचा खून केल्याचा आरोप होता. न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे आरोप सिद्ध ठरवत त्याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा तसेच १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास तीन महिन्यांचा अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
घटना कशी घडली?
फिर्यादी राजीव शंकरराव खनगन यांनी तक्रारीत नमूद केले की, त्यांची मोठी बहीण मंजुषा नाटेकर (वय ५५) प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका होती. तिचे पती जयंत नाटेकर गेल्या काही वर्षांपासून घरीच राहत होते. फिर्यादींचे मामा अशोक रामकृष्ण काटे (वय ७०) काही दिवसांपासून बहिणीसोबत राहत होते.
५ फेब्रुवारी २०२० रोजी शाळेकडून मंजुषा दोन दिवसांपासून गैरहजर असल्याची व तिचा मोबाईल बंद असल्याची माहिती मिळाल्याने फिर्यादी बहिणीच्या घरी गेले. तेथे बाहेरून कुलूप असल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने फ्लॅट उघडण्यात आला. आतमध्ये मामाचा मृतदेह हॉलमध्ये तर बहिणीचा मृतदेह शयनकक्षात आढळला. दोघांच्या गळ्यावर गळा आवळल्याचे आणि धारदार शस्त्राने वार झाल्याचे स्पष्ट झाले.
शेजाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दोन दिवस आधी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास दांपत्यामध्ये जोरदार वाद झाला होता. चौकशीतून उघड झाले की, कौटुंबिक वादातून आरोपी जयंत नाटेकर याने पत्नी आणि तिच्या मामाचा खून करून घराला कुलूप लावले व पळ काढला होता.
न्यायालयीन प्रक्रिया-
या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी केला. सरकारी पक्षाची बाजू अॅड. आसावरी परसोडकर यांनी मांडली, तर आरोपीतर्फे अॅड. के. एन. शोभने यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सुरेंद्र रौराळे व शिल्पा ईटनकर यांनी कार्य केले.न्यायालयाने आरोपी दोषी ठरवून जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली.