नागपूर : शहरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेकडून अपघातप्रवण स्थळांवर सुरक्षात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. अतिवेगाने वाहन चालवल्यामुळे शहरात अनेक प्राणांतिक अपघात घडले असून अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे.
यावर नियंत्रण मिळवण्यासाठी संबंधित विभागाकडून स्पीड ब्रेकर, रंबलर, हायमास्ट लाईट व साईड लेन आदी सुविधा उभारण्यात येत आहेत. त्यासोबतच, अतिवेगावर आळा घालण्यासाठी वाहतूक विभागाने झिक-झोंक पद्धतीने बॅरिकेड्स उभारले आहेत.
सध्या सक्करदरा वाहतूक परिमंडळासह विविध अपघातप्रवण स्थळांवर या उपाययोजना राबवण्यात आल्या असून त्याचे छायाचित्रेही पोलिसांनी जारी केली आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे हे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरत आहेत.
शहरातील नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन नागपूर शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.