नागपूर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “गेल्या ५० वर्षांत शरद पवारांसह काँग्रेसचे अनेक मराठा मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी समाजाला आरक्षण दिले नाही. मात्र देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदावर असताना हा ऐतिहासिक निर्णय घेतला. तरीही काँग्रेसकडून फक्त फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. फडणवीस ब्राम्हण आहेत म्हणून त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे का?असा सवाल असा सवाल बावनकुळेंनी केला.
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळायलाच हवे-
कोराडी येथील निवासस्थानी पत्रकार परिषदेत बोलताना बावनकुळे म्हणाले,आमची ठाम भूमिका आहे की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळायलाच हवे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील ह्याच भूमिकेवर ठाम आहेत. मात्र काँग्रेसकडे विचारावेसे वाटते की त्यांनी गेल्या कित्येक दशकांत मराठा समाजासाठी निर्णय का घेतला नाही?”
फक्त फडणवीसांनाच का निशाणा?
बावनकुळे म्हणाले,आज विविध नेत्यांनी पुढाकार घेतला असताना फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य केले जात आहे. ते मराठा नाहीत, ओबीसी नाहीत म्हणून का त्यांना टार्गेट केलं जातंय? मागणी करणं योग्य आहे, पण समाजाच्या प्रश्नावरून एखाद्या नेत्याला जातीवरून हिणवणं गैर आहे.”
काँग्रेसची दुटप्पी भूमिका?
काँग्रेसवर टीका करताना बावनकुळे म्हणाले, काँग्रेसने स्पष्ट करावं की ती ओबीसींचे आरक्षण कमी करून मराठ्यांना द्यायची की स्वतंत्र आरक्षणाच्या बाजूने आहे? राहुल गांधी एका बाजूला जातीय जनगणनेची मागणी करतात आणि दुसऱ्या बाजूला ओबीसींच्या विरोधात पाऊल उचलतात. हे दुटप्पी राजकारण आहे.”
कोणाचाही हक्क कमी होऊ नये-
सरकार आंदोलनकर्त्यांशी संवाद साधेल, पण निर्णय घेताना कुठल्याही समाजाचे आरक्षण कमी होणार नाही याची काळजी घेणार. मराठा समाजाला आरक्षण हवे, पण ओबीसीसह इतर कोणत्याही समाजाचा हक्क कमी होता कामा नये. आमची भूमिका एकच, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालेच पाहिजे, असेही ते म्हणाले.