नागपूर – नागपूर शहर पोलीस ठाणे खापरखेडा हद्दीत गुन्हे शाखा, युनिट क्र. ५ ने दोन वेगवेगळ्या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत दोघांकडून एकूण दोन अग्निशस्त्र, सात जिवंत काडतूस, वाहन आणि मोबाईलसह ४,५७,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाईत ताब्यात घेतलेले पहिले आरोपी सुमित संजय सोनवणे (वय २९, रा. पवनी, ता. रामटेक, नागपूर) आहे. त्याच्याकडून मॅक्झिन नसलेले एक अग्निशस्त्र, पाच जिवंत काडतूस, एक फोर व्हीलर वाहन आणि मोबाईल जप्त करण्यात आले. या सर्व मालमत्तेची एकूण किंमत अंदाजे ३,४५,००० रुपये आहे.
दुसरा आरोपी झांगुरसिंग उर्फ विकी सरनागते (रा. महाजन नगर, टेकाडी कोयला खदान, ता. पारशिवनी, नागपूर) असून त्याच्याकडून मॅक्झिन असलेले एक अग्निशस्त्र, दोन जिवंत काडतूस, एक टू व्हीलर वाहन आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहे. या सर्व मालमत्तेची किंमत अंदाजे १,१२,००० रुपये आहे.
दोन्ही कारवाईत एकत्रितपणे जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत ४,५७,००० रुपये आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा, युनिट ५ ने कलम ३ व २५ आर्म्स ॲक्टनुसार दोन्ही आरोपींविरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.
पोलीस निरीक्षक, युनिट ५, गुन्हे शाखा, नागपूर शहर यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपी व जप्त मालमत्ता पोलीस ठाणे खापरखेडा नागपूर शहराच्या ताब्यात देण्यात आले आहेत.