मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा संघर्षाची दिशा मुंबईकडे वळवली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून २७ ऑगस्ट रोजी सुरू होणारा मोर्चा दोन दिवसांचा प्रवास करत २९ ऑगस्टच्या रात्री मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचणार आहे. या मोर्चात राज्यभरातून हजारोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी होणार असून, त्याच काळात मुंबईत गणेशोत्सवाची लगबग असल्याने प्रशासनासाठी ही मोठी कसोटी ठरणार आहे.
गावोगावी चावडी बैठका घेऊन ‘चलो मुंबई’चा जयघोष केला जात आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि धाराशिवसह विविध भागातून समाजबांधव मोठ्या संख्येने या लढ्यात सहभागी होणार आहेत. मार्गावरील ठिकठिकाणी स्वागताची जय्यत तयारी केली जात असून, जरांगेंच्या नेतृत्वाखालील या मोर्चाने आधीच राज्यात उत्सुकता निर्माण केली आहे.
मनोज जरांगे यांनी सरकारला अल्टिमेटम देत स्पष्ट केले आहे की, २६ ऑगस्टपर्यंत आरक्षणाबाबत ठोस निर्णय झाला नाही, तर २९ ऑगस्ट रोजी लाखोंच्या संख्येने मराठा बांधवांसह आम्ही आझाद मैदान गाठणार आहोत. प्रशासनाने कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची मोठी फौज तैनात करण्याची तयारी सुरू केली आहे.