नागपूर : स्वावलंबीनगरातील राधे मंगल कार्यालयाजवळील रिंगरोडवर पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी तेथून भूमिगत बॉक्स पद्धतीचा वापर करून पाणी शास्त्रीनगराजवळील नाल्यामध्ये सोडण्यात येणार आहे. या प्रस्तावित काम करताना लोकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
यासाठी महानगरपालिकेची जलवाहिनी, ड्रेनेज, दूरसंचार विभागाच्या केबलचे स्थानांतरण कसे केल्या जाईल, याचा प्रस्तावित जागेवर जाऊन आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यावेळी अधीक्षक अभियंता श्रीमती लिना उपाध्ये, राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (जागतिक बँक) कार्यकारी अभियंता श्रीमती कृशा घरडे, कार्यकारी अभियंता श्री. रविंद्र बुंधाडे, उपअभियंता श्री. आशीष कुर्वे उपस्थित होते.
राधे मंगल कार्यालयाच्या सिमेंट रोडवर पावसाळ्यात पाणी साचून राहत असल्याने वाहतुकीला अडथळा येण्याचे प्रकार घडतात. हे टाळण्यासाठी तेथून भूमिगत पद्धतीने हे पाणी थेट शास्त्रीनगरातील नाल्यात सोडण्यात येणार आहे. जवळपास दीड किलोमीटर अंतराचा असलेला ही प्रस्तावित योजना त्वरित पूर्ण करून लोकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे डॉ. चौधरी यांनी सुचविले. जलवाहिनी, मलनिःसारण वाहिनी, विद्युत केबल व दूरसंचारच्या केबलचे स्थानांतरण करताना नागरी सुविधांमध्ये अडथळे येणार नाही, याची काळजी हा प्रकल्प करताना अधिकाऱ्यांनी घ्यावी, असेही त्यांनी सुचविले.