नागपूर : शहराच्या वाहतुकीला नवे स्वरूप देण्यासाठी प्रस्तावित मल्टी-मॉडल ट्रान्सपोर्ट हब उभारणीला हिरवा कंदील मिळाला आहे. महाराष्ट्र सरकारने या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी ३१.३३ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून, आता भू-अधिग्रहणाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या निर्णयाची माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सरकारतर्फे देण्यात आली आहे.
शहराच्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकाजवळ हा आधुनिक हब उभारण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मध्यप्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळ तसेच नेहरू मॉडेल हायस्कूलची जमीन अधिग्रहित केली जाणार आहे.
या प्रकल्पाच्या अनुषंगाने टेकडी गणेश उड्डाणपुलाखालील पात्र व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्यात येणार असून, त्यांच्या व्यवसायावर कोणताही विपरित परिणाम होऊ नये याची काळजी घेतली जाणार आहे.
न्यायालयाने सरकारला २५ सप्टेंबरपर्यंत भू-अधिग्रहण प्रक्रियेतील पुढील टप्पे आणि निधी वापराबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
हा नवा मल्टी-मॉडल ट्रान्सपोर्ट हब नागपूरच्या वाढत्या वाहतूक गरजा भागवण्यासाठी तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.