नागपूर :आगामी सण-उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नागपूर शहर पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. परिमंडळ क्रमांक ४ अंतर्गत येणाऱ्या अजनी व नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिन्ही सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए आणि तडीपार कारवाई करण्यात आली आहे.
एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध-
नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अरमान उर्फ इमरान मलिक रऊफ खान मलिक (३२, रा. सद्भावना नगर, नागपूर) या कुख्यात गुन्हेगारावर तब्बल ८ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मारहाण, विनयभंग, खंडणी, प्राणघातक शस्त्र बाळगणे असे गंभीर आरोप आहेत. वेळोवेळी केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईनंतरही तो सुधारला नसल्याने त्यास १ वर्षाकरिता एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे.
दोन वर्षांसाठी तडीपार-
- सुमित उर्फ भोला रमेश वाघमारे (२७, रा. जयभीम चौक, हिवरीनगर) याच्यावर जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, खंडणी, धमक्या असे एकूण ५ गुन्हे नोंद आहेत. त्याला २ वर्षांसाठी नागपूर शहर व जिल्ह्याबाहेर तडीपार करण्यात आले असून नातेवाईकांच्या ताब्यात भंडारा येथे सोडण्यात आले आहे.
- रितेश भिमराव गवई (३६, रा. बाबुलखेडा, अजनी) याच्यावर ९ गंभीर गुन्हे दाखल असून त्यात अपहरण, बलात्कार, खंडणी, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी आदी गंभीर प्रकरणांचा समावेश आहे. तोदेखील सुधारला नसल्याने त्याला २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले असून अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे नातेवाईकांकडे सोडण्यात आले आहे.
गुन्हेगारीत लक्षणीय घट-
मा. पोलीस उपायुक्त रश्मिता राव (भा.पो.से.), परिमंडळ क्र.४ यांच्या आदेशानुसार, सराईत गुन्हेगारांवर सातत्याने कारवाई सुरू आहे. यावर्षी जुलै २०२५ अखेर परिमंडळ-४ अंतर्गत एमपीडीए अंतर्गत १० कारवाया व ११ तडीपार कारवाया करण्यात आल्या आहेत. यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी शरीराविरुद्ध गुन्ह्यांत १२ ने व मालमत्तेविरुद्ध गुन्ह्यांत तब्बल १९४ ने घट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांचे हे कठोर पाऊल आगामी सण-उत्सव काळात गुन्हेगारांना आळा बसविण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.