भंडारा जिल्ह्यात गरीब आणि कामगार वर्गासाठी दिलासा ठरलेली शिवभोजन योजना आता गंभीर अडचणीत सापडली आहे. फेब्रुवारीपासून केंद्र चालकांना शासनाकडून एकही रुपया अनुदान मिळालेले नाही. सात महिन्यांपासूनची ही थकबाकी वाढत गेल्याने केंद्र चालकांवर आर्थिक संकट कोसळले आहे आणि योजना पूर्णपणे थांबण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शिवभोजन थाळीची किंमत पन्नास रुपये असून लाभार्थ्यांकडून फक्त दहा रुपये घेतले जातात, तर उर्वरित चाळीस रुपये शासन देते. मात्र अनुदान न मिळाल्याने केंद्र चालकांना भाडे, वीज, गॅस, किराणा आणि कर्मचारी पगार यांसारख्या आवश्यक खर्चासाठी धडपड करावी लागत आहे. व्यापाऱ्यांनी उधारीवर वस्तू देणेही बंद केल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
गेल्या पाच वर्षांत महागाई झपाट्याने वाढली असून गॅस, डाळी, तेल आणि भाज्यांच्या किमतींनी थाळीचा खर्च दुप्पट केला आहे. पण शासनाचे अनुदान जसंच्या तसं असल्याने केंद्र चालकांची कोंडी झाली आहे. दररोज ५४ केंद्रांतून सुमारे ५,८०० थाळ्या दिल्या जात असून हजारो गरीब व कामगारांचे पोट या योजनेवर अवलंबून आहे.
केंद्र चालकांमध्ये तीव्र नाराजी असून त्यांनी शासनाला तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. अन्यथा सर्व केंद्रे बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. गरीब आणि गरजूंसाठी सुरू केलेली ही योजना कायम राहील की नाही, याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.