नागपूर : रविवारी रात्री सीताबर्डी परिसरात गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकाने सापळा रचून अकोल्याच्या तरुणाला अटक केली. त्याच्याकडून तब्बल 2.04 किलो गांजा जप्त करण्यात आला असून, बाजारमूल्य अंदाजे 51 हजार इतके असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक झालेल्या आरोपीचे नाव शोएब शेख जमीअर (22, रा. दाबकी रोड, भगवटवाडी, अकोला) असे आहे. तो ब्राऊन रंगाच्या ट्रॉली सूटकेसमध्ये गांजा घेऊन फिरत असताना पोलिसांच्या हाती लागला. प्राथमिक तपासात आरोपी विक्रीसाठी हा गांजा नागपुरात आणल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी सीताबर्डी पोलिस ठाण्यात NDPS कायद्याच्या कलम 8(c), 20(b)(2)(B) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) संजय पाटील, पोलिस उपायुक्त (डिटेक्शन) राहुल माकनिकर आणि सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा) अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ५ च्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी केली.