नागपूर : शहरातील गुन्हेगारी विश्वाला हादरवणारी घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राजीव गांधी नगर पुलाच्या खाली एका कुख्यात हिस्ट्रीशीटरची अत्यंत अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली. मृतकाची ओळख समीर शेख उर्फ येडा शमशेर खान (वय ३०) अशी असून तो राजीव गांधी नगर परिसरात राहणारा होता.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या गुरुवारी पहाटे वर्चस्वाच्या संघर्षातून घडली असून आरोपींनी कोयते आणि बेसबॉलच्या दांडक्यांनी समीरवर प्राणघातक हल्ला केला. समीर शेख विरोधात एमपीडीए, खूनाचा प्रयत्न, मारहाण अशा तब्बल ३१ पेक्षा जास्त गुन्हे दाखल होते. तो गांजासह विविध ड्रग्जच्या तस्करीसाठी ओळखला जात होता.
या हत्येमागे अशु नावाच्या गुन्हेगाराचा हात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अशु आणि त्याच्या टोळीने योजनाबद्धपणे या खुनाला अंजाम दिल्याची चर्चा असून, हल्ला अशुच्या घराजवळच झाला आहे. खून घडल्यानंतर अशु फरार झाला असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
ही घटना घडली तेव्हा समीर मोमिनपुरा येथील आपल्या सासरहून घरी परतत होता. घटनेची माहिती मिळताच यशोधरा नगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेसाठी पाठवला. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नागपूरच्या गुन्हेगारी विश्वात खळबळ उडवणाऱ्या या हत्येचं गूढ लवकरात लवकर उलगडण्याचं आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहे.