नागपूर – शहरातील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरेंद्र नगर परिसरात सर्व्हिस अपार्टमेंटच्या आड सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी कारवाई करत मोठा खुलासा केला आहे. संकेत टवले या आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्या ताब्यातून दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने लोटस सर्व्हिस अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक ६४ एक महिन्यांपूर्वी भाड्याने घेतला होता. या ठिकाणी तो देहव्यवसाय चालवत होता. क्राईम ब्रँचच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवत छापा टाकला.
छाप्यावेळी पोलिसांना दोन पीडित महिला सापडल्या असून त्या नागपूरच्या रहिवासी आहेत. ‘थोड्या वेळात अधिक पैसे कमावता येतील’ या आमिषाने त्यांना या अनैतिक धंद्यात ओढण्यात आले होते.
आरोपी संकेत टवले याच्यावर वेश्या व्यवसाय चालविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाईसाठी त्याला बेलतरोडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नागपूर पोलिसांनी ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत शहरातील अशा अनैतिक धंद्यांवर कारवाईचा बडगा उचलला असून, असे रॅकेट उघडकीस आणण्यासाठी गुप्त माहितीदारांची मदत घेतली जात आहे.