
नागपूर :गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेने तिचं नो-पार्किंगमधून टो करण्यात आलेलं दुचाकी वाहन दंड न भरता सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतर त्याच महिलेसोबत असलेल्या इसमाने पोलीस निरीक्षकांशी वाद घालत अश्लील भाषेचा वापर करत सोशल मीडियावर पोलिसांची बदनामी करणारा व्हिडीओ प्रसारित केला. या प्रकरणी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी, वाहतूक पोलीस निरीक्षक श्सुहास चौधरी हे आपल्या कक्षात दैनंदिन कर्तव्यात व्यस्त असताना, एका महिलेने भेट घेऊन आपले वाहन क्रमांक MH-49-BT-7697 हे नो-पार्किंगमधून टो करण्यात आले असून तीला तातडीने बाहेर जायचे आहे, अशी विनंती करत दंड न भरता वाहन सोडवण्याची मागणी केली.
सदर महिलेच्या गयावया पाहून निरीक्षक चौधरी यांनी टोइंग जबाबदारी पार पाडणाऱ्या खाजगी व्ही.आय.पी.एल. कंपनीच्या कर्मचाऱ्याला वाहन सोडण्याचे निर्देश दिले. त्यानंतर बाहेर काही आरडाओरड ऐकू आल्याने निरीक्षक बाहेर आले असता, त्या महिलेसोबत असलेला विनोद कल्याणी नावाचा इसम, कर्मचाऱ्याशी वाद घालत होता.
तो इसम “पोलीसांचे चलान मशिन खाजगी कर्मचाऱ्याजवळ कसे?” अशी विचारणा करत होता. चौधरी यांनी त्याला माहिती दिली की, संबंधित मशिन कंपनीने अधिकृतरित्या दिले आहे. मात्र समाधान न झाल्याने त्या इसमाने मोबाईलने व्हिडीओ शुटिंग चालू केले व पोलिसांवर “दल्ले, दलाल, साले” अशा अत्यंत अश्लील भाषेचा वापर केला.
यानंतर सदर महिला आणि विनोद कल्याणी वाहन घेऊन निघून गेले. परंतु त्याच दिवशी दुपारी ४ वाजताच्या सुमारास, “हे बावा, नागपूर इन्स्टाग्राम” या समाजमाध्यम प्लॅटफॉर्मवरून सदर व्हिडीओ सार्वजनिक करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा समाजात मलीन झाली असल्याचे निरीक्षक चौधरी यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
यासंदर्भात गिट्टीखदान पोलीस ठाण्यात विनोद कल्याणी, MH-49-BT-7697 वाहनाची चालक महिला, तसेच सत्यता न पडताळता व्हिडीओ प्रसारित करणारे “हे बावा, नागपूर इन्स्टाग्राम” या सोशल मिडिया पेजच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २९६, २२१, २५६(२), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.