नागपूर :डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, नागपूरच्या हीरक महोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने एक भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याला भारताचे सरन्यायाधीश मा. श्री भूषण गवई आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात महाविद्यालयाच्या शैक्षणिक, प्रशासकीय आणि सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
या सन्मान सोहळ्यात महत्त्वाची उपस्थिती असलेले विद्यार्थी आणि त्यांच्या विशेष कामगिरीची झलक पुढीलप्रमाणे :
सावी श्रीकांत बुलकुंडे – 2024 च्या भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) परीक्षेमध्ये 517 वा क्रमांक पटकावणारी ही विद्यार्थिनी कॉलेजचा आणि शहराचा अभिमान ठरली आहे.
चारुल मनीष विटाळकर – दहावीच्या बोर्ड परीक्षेत टॉप करत तिने शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली. शिवाय तिने सीए फाउंडेशन परीक्षाही उत्तीर्ण केली आहे.
रुचिका समीर बाकरे – चारुलप्रमाणेच रुचिकानेही दहावीमध्ये टॉप स्थान पटकावले असून सीए फाउंडेशन यशस्वीपणे पार केली आहे.
भूमिजा संदीप अग्रवाल – दक्षिण कोरियाच्या संस्कृती, क्रीडा आणि पर्यटन मंत्रालयात मानद पत्रकार म्हणून कार्य करणारी ही विद्यार्थिनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करत आहे.
निखिल मोटघरे – ‘अर्बन स्टडीज अँड प्रॅक्टिस’ या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त करून शहरी विकासासंबंधित क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत आहे.
या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “डॉ. आंबेडकर कॉलेज केवळ शिक्षणसंस्थाच नाही, तर सामाजिक परिवर्तनाचा मूळ गाभा आहे. अशा संस्थेतून घडणारे विद्यार्थी हे नव्या भारताची बीजे आहेत.”
सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांनीही आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना संविधानात्मक मूल्यांवर आधारित शिक्षणाची गरज अधोरेखित केली.
हीरक महोत्सवाच्या निमित्ताने झालेले हे सन्मान सोहळे महाविद्यालयाच्या गुणवत्तेची साक्ष देतात. विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळवलेल्या यशामुळे संपूर्ण नागपूरकरांना अभिमान वाटतो आहे.