नवी दिल्ली – पावसाळी अधिवेशनात राजकीय तापमान वाढत असतानाच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘ओबीसी पार्टनरशिप जस्टिस कॉन्फरन्स’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. माध्यमांनी मोदी यांची जी प्रतिमा उभी केली आहे, ती केवळ एक दिखावा असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
मोदी यांचं प्रभाव केवळ मीडिया निर्मित-
राहुल गांधी म्हणाले, “राजकारणातील खरी समस्या कोणती?” असा प्रश्न मी उपस्थित केला असता, एका व्यक्तीने उत्तर दिलं – नरेंद्र मोदी. त्यावर माझं उत्तर स्पष्ट होतं – मोदी हे स्वतःमध्ये समस्या नाहीत, तर माध्यमांनी त्यांना इतकं मोठं करून दाखवलं आहे. मी स्वतः दोन वेळा त्यांच्याशी चारचौघात भेटलो आहे. ती प्रतिमा खरी नाही, ती केवळ एक आभास आहे,” अशी टीका त्यांनी केली.
ओबीसी समाजाच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा ऐरणीवर-
मोदींनी अनेकदा ‘हिंदू भारत’ या संकल्पनेचा उल्लेख केला आहे, त्यावरही राहुल गांधी यांनी सवाल उपस्थित केला. “जर भारत हिंदू राष्ट्र असेल आणि ५० टक्क्यांहून अधिक हिंदू ओबीसी असतील, तर मग मीडिया, कॉर्पोरेट क्षेत्र आणि निर्णय प्रक्रियेत ओबीसी लोक कुठे आहेत?” असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
जातीय जनगणनेच्या मागणीवर ठाम-
“काँग्रेसशासित राज्यांमध्ये आम्ही जातीय जनगणना करणार आहोत, कारण त्यामुळे समाजात कोणाचा किती वाटा आहे हे स्पष्ट होईल. हे माझं ध्येय आहे – प्रत्येकाच्या कामाला सन्मान आणि स्थान मिळालं पाहिजे,” असं म्हणत राहुल गांधी यांनी सामाजिक न्यायाचा मुद्दा पुढे रेटला.
मी थांबणार नाही-
राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्यात ठामपणा दर्शवत म्हटलं, “प्रियांका गांधींना विचारा – जर मी एखादा निर्णय घेतला, तर मी तो पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही. जातीय जनगणना ही फक्त सुरुवात आहे. माझं उद्दिष्ट आहे की, प्रत्येक भारतीयाला समाजात मान-सन्मान मिळावा.”