नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने केंद्र सरकारच्या ‘ई-समर्थ’ डिजिटल प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीत महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले आहे. विद्यापीठाच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) सेलच्या माध्यमातून आतापर्यंत ४० पैकी ३६ मॉड्यूल्स यशस्वीरित्या राबवण्यात आले आहेत. यामुळे प्रशासनिक आणि शैक्षणिक कामकाज अधिक गतिमान आणि पारदर्शक बनले आहे.
‘ई-समर्थ’ ही प्रणाली केंद्र सरकारने २०२२ पासून देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये कार्यक्षमतेत वाढ व पारदर्शकता यासाठी सुरू केली आहे. नागपूर विद्यापीठानेही त्याच वर्षी टप्प्याटप्प्याने या प्रणालीची अंमलबजावणी सुरू केली. परीक्षा, वित्त, लेखा, प्रशासन व शैक्षणिक विभागातील अनेक महत्त्वाची कामे आता डिजिटल पद्धतीने केली जात आहेत. विशेषतः परीक्षा विभागाचे कामकाज ऑनलाइन झाल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, गुणपत्रक आदी सेवा कमी वेळेत मिळू लागल्या आहेत.
प्रभारी कुलगुरु डॉ. माधवी खोडे चवरे, प्र-कुलगुरु डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी डॉ. श्वेता बारहाते आणि समन्वयक सतीश शेंडे हे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यरत आहेत. विद्यापीठाच्या आयटी सेलच्या टीमने वेबसाइट व्यवस्थापन, नेटवर्किंग, तसेच प्रशासनिक व शैक्षणिक कार्यालयांतील कामकाज डिजिटल स्वरूपात यशस्वीपणे पूर्ण केले आहे.
या प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे विद्यापीठाची कार्यपद्धती अधिक गतिमान, पारदर्शक व आधुनिक होत असून, भविष्यात अन्य शैक्षणिक उपक्रमांमध्येही याचा उपयोग होणार असल्याचे संकेत विद्यापीठ प्रशासनाने दिले आहेत.