नागपूर : नागपूर शहरात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन U-टर्न’ मोहिमेदरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याशी चार जणांनी अर्वाच्य भाषेत बोलून धक्काबुक्की केली. हे प्रकरण गंभीर असतानाही अद्याप कोणतीही अटक झाली नसल्याने पोलिस यंत्रणेतच न्याय मिळतो की नाही, असा सवाल उपस्थित होतो आहे.
ही घटना जरीपटका परिसरातील जिंजर मॉलजवळ घडली. रात्रपाळीत कर्तव्यावर असलेले ट्राफिक पोलिस कॉन्स्टेबल संजय चतुर्वेदी यांनी एका संशयास्पद कारला थांबवून कागदपत्रांची मागणी केली. मात्र कारचालक हितेश राजकुमार गज्रानी (३२) याने सहकार्य करण्याऐवजी हुज्जत घालायला सुरुवात केली.
या झगड्यादरम्यान हितेशने आपल्या भावाला वृशभ गज्रानीला बोलावलं, जो काही वेळातच आपल्या दोन मित्रांसह मोहित पम्नानी (३४) आणि मनीष वासवानी (२८) घटनास्थळी पोहोचला. चौघांनी मिळून ड्युटीवरील पोलिस कर्मचाऱ्याशी अर्वाच्य भाषेत बोलत, ढकलाढकली केली आणि त्यांचा मोबाईल हिसकावण्याचाही प्रयत्न केला.
या प्रकरणी जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी आरोपी अजूनही मोकाट आहेत. हे आश्चर्यकारक आहे की जिथे घटनास्थळी साक्षीदार आणि पुरावे दोन्ही असताना, त्वरित कारवाई का होत नाही?
पोलिस खात्याचा एक कर्तव्यदक्ष अधिकार जेव्हा स्वतःच अशा प्रकारच्या अत्याचाराचा बळी ठरतो आणि त्यालाही न्याय मिळत नसेल, तर सामान्य नागरिकांनी काय अपेक्षा ठेवायची?
न्याय कुणासाठी आणि केव्हा?
हा प्रश्न आता फक्त नागपूरकरांचा नाही, तर संपूर्ण राज्यातील पोलीस दलाचा आणि लोकशाहीत विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आहे.