मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच मंत्रिमंडळ फेरबदल करत धक्का देणारी रणनीती अवलंबणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या ‘धक्का तंत्रा’मुळे अनेक सध्या कार्यरत मंत्र्यांची खुर्ची जाणार असल्याची जोरदार चर्चा असून, नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, राज्याच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात येणार आहेत. हे बदल केवळ भाजपपुरते मर्यादित राहतील की शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी उलथापालथ होणार, यावर सध्या चर्चेला उधाण आलं आहे.
महायुती सरकारमध्ये अंतर्गत तणाव?
महायुती सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून दिसून येणाऱ्या अंतर्गत तणावाच्या पार्श्वभूमीवर हा संभाव्य फेरबदल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या फेरबदलात तिन्ही पक्षांतील काही बड्या नावांचे पत्ते कट होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या राजकीय खेळीमुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्याने गणित मांडले जातील, अशी चर्चा सुरू आहे.
नव्या चेहऱ्यांचा प्रवेश, विरोधकांत खळबळ-
या फेरबदलादरम्यान पक्षसंघटनेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या, तसेच आपल्या भागात प्रभावी उपस्थिती असलेल्या नेत्यांना संधी मिळेल, असे बोललं जात आहे. विशेष म्हणजे काही इतर पक्षांतील दिग्गजांना भाजप किंवा महायुतीत सामावून घेऊन त्यांना थेट मंत्रिपदे देण्यात येतील, असा प्लान तयार असल्याची माहिती आहे. त्यामुळे विरोधकांमध्येही अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सत्ताकारणाची पुढची वाटचाल ठरणार निर्णायक-
या संभाव्य फेरबदलामुळे राज्याच्या सत्ताकारणातील समीकरणे पूर्णतः बदलू शकतात. कोणाचे पत्ते कट होतील, कोण नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळवेल, याकडे सध्या संपूर्ण राज्याचेच नाही तर देशाचं लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढील पावलावर आता महायुतीतील सत्तासमिकरण आणि आगामी राजकीय दिशा अवलंबून राहणार आहे.